ओअॅसिस – पान १

घड्याळात एकचा टोला पडला आणि दिवाणखान्यातील एका खुर्चीत झोपलेला हरी खडबडून जागा झाला. रात्रीच्या निरव शांततेत त्याला तो स्वर कर्कश्श वाटला. एव्हढ्यात गाडीचा परिचित आवाज कानावर पडला म्हणून त्याने खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले. देवदत्त आले होते. लगबगीने बंगल्याचा दरवाजा उघडून तो बाहेर आला व गाडीचा दरवाजा उघडून त्याने देवदत्तांना बाहेर पडण्यासाठी हात दिला. त्याचा हात झिडकारून देवदत्त बाहेर पडले व अडखळत, पडत दिवाणखान्यात आले. नेहमीप्रमाणेच ते आजही शुद्धीत नव्हते पण या परिस्थितीतही, ते स्वत: गाडी चालवून घरापर्यंत आले, याचं हरीला नवल वाटलं. ड्रायव्हरला त्यांनी बहुतेक संध्याकाळीच रजा दिली होती.

एक क्षण जागच्याजागी थबकून, मागेच उभ्या असलेल्या हरीकडे वळून देवदत्त म्हणाले, “जा, झोप जा. मी जेवून आलोय.” देवदत्त कुठेही बाहेर जेवून आलेले नसणार तरीही त्यांना आत्ता जेवणाची जबरदस्ती करण्यात काहीच अर्थ नाही, हे हरीला सवयीने माहीत झालं होतं पण मालकाबद्दल असलेली कळकळ त्याला गप्प बसू देईना. भितभितच त्याने विचारलं, “निदान ज्यूस तरी…” त्याचं वाक्य अर्धवट तोडत देवदत्त त्याच्यावरच डाफरले, “नको म्हटलं ना एकदा!” एव्हढं बोलून ते आपल्या बेडरूमच्या दिशेने असलेला जिना चढू लागले.

काही न बोलता हरीदेखील त्यांच्या मागोमाग वर गेला. बेडरूममध्ये गेल्यावर देवदत्तांनी धाडकन बिछान्यावर अंग झोकून दिलं. हरी त्यांच्या खोलीच्या दरवाजाजवळच उभा राहिला. देवदत्त पूर्णपणे झोपी गेल्याची खात्री पटताच तो पुढे झाला आणि त्याने त्यांच्या डोक्याखाली उशी ठेवली, त्यांच्या पायातले बूट आणि मोजे काढून कोपर्‍यात असलेल्या शू रॅकमध्ये ठेवून दिले. झोपलेल्या देवदत्तांकडे डबडबलेल्या डोळ्यांनी एक कटाक्ष टाकत त्याने सुस्कारा सोडला आणि खोलीचं दार लावून तो झपाझप जिने उतरून खाली आला.

आता हे रोजचंच झालं होतं. सकाळी व्यवस्थित कामाला बाहेर पडलेले देवदत्त, रात्री घरी येताना स्वत:चा तोल सावरण्याच्याही मन:स्थितीत नसायचे. ज्या माणसाने दारूला कधी स्पर्शही केला नव्हता, तोच माणूस गेले आठ महीने दारूत आकंठ बुडाला होता.

Author: vijay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *